'श्रेयांक बँक’ संकल्पना पुढील वर्षांपासून : विषय, कालावधी निवडीचे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य
पदवीसाठी तीन वर्षे, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे अशा उच्चशिक्षणातील कालमर्यादेच्या चौकटी आता संपुष्टात येणार आहेत. विद्यार्थी विविध विषयांचे श्रेयांक साठवून त्यानुसार प्रमाणपत्र, पदविका, पदवी हे शिक्षणाचे वेगवेगळे टप्पे आता पूर्ण करू शकतील. श्रेयांक साठवण्यासाठी ‘श्रेयांक बँके’ची संकल्पना पुढील वर्षांपासून अमलात आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मसुदा तयार केला आहे.
उच्च शिक्षणातील प्रमाणपत्रापासून ते पीएच.डीपर्यंतचे वेगवेगळे अभ्यास टप्पे पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता ठरावीक कालमर्यादेचे बंधन राहणार नाही. हवे ते विषय शिकून त्याचे श्रेयांक विद्यार्थी साठवू शकतील. साठवलेले श्रेयांक गरजेनुसार वापरून वेगवेगळ्या टप्प्यातील शैक्षणिक मान्यता मिळवण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे. एका विषयाचे श्रेयांक विद्यार्थी सात वर्षांपर्यंत वापरू शकणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार ‘शैक्षणिक श्रेयांक बँक’ (अॅकॅडमिक क्रेडिट बँक) स्थापन करण्यासाठी आयोगाने मसुदा केला आहे. त्यामुळे विषय निवडीचे आणि कालमर्यादा निवडण्याचे स्वतंत्र्यही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कोणत्याही टप्प्यावर शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेल्या श्रेयांकानुसार प्रमाणपत्र किंवा पदविका मिळू शकेल. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०२१-२२) श्रेयांक बँक स्थापन होणार असून राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन प्रणालीकडून (नॅक) ‘अ’ श्रेणी मिळालेले महाविद्यालय किंवा विद्यापीठाला या योजनेत सहभागी होता येईल.
सध्या ढोबळपणे पदवी अभ्यासक्रम तीन वर्षे, पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षे अशा कालमर्यादेच्या चौकटी आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमांत ठरावीक वर्षांत, ठरावीक विषय शिकण्याचेही बंधन आहे. आता विद्यार्थी त्यांना हवे ते विषय निवडून त्याचे श्रेयांक मिळवू शकतील. प्रत्येक विषयाचे श्रेयांक मिळवण्यासाठी ठरावीक तास शिक्षण पूर्ण करणे, प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक आहे. श्रेयांक बँकेतील खात्यात विद्यार्थी त्यांचे श्रेयांक जमा करू शकतील. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेले श्रेयांक खात्यात साठल्यावर विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार त्यांचा वापर करू शकतील. एका विषयाचे श्रेयांक सात वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना वापरता येऊ शकतील. त्याचप्रमाणे एका विषयाचे श्रेयांक एका टप्प्यासाठी वापरल्यास ते दुसऱ्या टप्प्यासाठी वापरता येणार नाहीत.
विषय निवडीचे स्वातंत्र्य : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय आणि संस्था निवडण्याचे स्वातंत्र्य मिळू शकणार आहे. त्यासाठी विद्याशाखांचे बंधन असणार नाही. ‘श्रेयांक बँके’शी जोडल्या गेलेल्या कोणत्याही संस्थेत विद्यार्थी शिकू शकतील. ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली असेल तेथील अभ्यासक्रम आराखडय़ानुसार ५० ते ७० टक्के श्रेयांक आणि इतर विद्यापीठ किंवा संस्थेतून ३० ते ५० टक्के श्रेयांक विद्यार्थी मिळवू शकतील. एखाद्या विशिष्ट विद्याशाखेतील पदवी मिळवण्यासाठी त्या शाखेतील महत्त्वाच्या विषयांचे श्रेयांक मिळवणे बंधनकारक असेल. पदवी घेण्यासाठी पुरेसे श्रेयांक आहेत. परंतु ते एका कोणत्याही विशिष्ट शाखेतील नाहीत अशा विद्यार्थ्यांना पदवी हवी असल्यास ‘लिबरल आर्टस’मधील पदवी देण्यात येईल.
विद्यार्थ्यांना कोणताही विषय, कुठेही शिकण्याचे आणि त्यासाठी कालावधीही ठरवण्याचे स्वातंत्र्य ‘अॅकॅडमिक क्रेडिट बँक’ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. देशाच्या उच्चशिक्षणातील येऊ घातलेल्या बदलांची ही नांदी आहे. या योजनेत सहभागी होऊनही त्याचे नियम न पाळणाऱ्या संस्थांवर कारवाईची तरतूदही मसुद्यात आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEW EDUCATION POLICY NEP-2020) pdf डाऊनलोड लिंक :
- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग
- लोकसत्ता न्युज नेटवर्क










